जाहीर आवाहन
ग्राम सेवा मंडळ, वर्धा येथील पेळू संयंत्रे बदलवण्यासाठी आर्थिक सहयोगाची विनंती!
प्रिय मित्र,
तुम्हाला कळवण्यास आनंद होतो की, महाराष्ट्रातील विदर्भ भागात स्थानिक पातळीवर सामान्य देशी कापसापासून (Non GM) कापड बनवण्याचे आमचे काम आता जोर धरत आहे. कापूस ते कपडा प्रक्रियेत महत्वाची असलेली कताईपूर्व (pre-spinning) विभागातील यंत्रे बदलवणे ही एक मोठी गरज आहे. त्याकरिता तुमच्या सहयोगाची अपेक्षा आहे.
१९३४ साली विनोबा भावे यांनी स्थापलेले ग्राम सेवा मंडळ (ग्रा.से.मं.) स्थानिक कत्तीनी, विणकर, कास्तकारांसमावेत खादी कापड उत्पादनाचे कार्य गोपुरी, वर्धा येथे करत आहे. येथील पेळू विभागात १९२०, १९४८, १९५१ सालची यंत्रे आहेत. त्यांची कार्यक्षमता व दर्जा खालावला आहे. मध्यंतरी अनेक वर्ष हा पेळू विभाग बंद होता. म्हणून आम्ही पेळू विभाग पुन्हा सुरु केला तेव्हा ही जुनी यंत्रे बदलून अधिक कार्यक्षम नवीन यंत्रे बसवण्याची गरज लक्षात आली आहे. ही यंत्रे बदलल्यास उत्तम दर्जाचे कापड देशी कापसापासून बनवण्याची पूर्ण प्रक्रिया स्थानिक पातळीवर अधिक वेगवान होईल.
ग्रा.से.मं.च्या पेळू विभागाच्या नूतनीकरणाने काय उपयोग होईल?
खालील आकृतीत कापूस ते कपड्यापर्यंतच्या प्रक्रियेत पेळू बनविण्याची प्रक्रिया कापड बनविण्यासाठी किती महत्त्वाची आहे हे समजते
- सद्यस्थितीत शेतकरी कापसाच्या जी. एम. (जनुकीय परिवर्तीत) वाणावर अवलंबून आहेत. शेतीची स्थिती सुधारण्यासाठी स्थानिक, देशी, non GM कापसाच्या माध्यमातून बीज स्वराज साध्य करणे निकडीचे आहे. अशा कापसापासून स्थानिक पातळीवर कापड बनवल्याने देशी कापूस उत्पादनाला अधिक चालना मिळेल.
- छोट्या धाग्याच्या देशी कापसाचा शुद्ध पेळू (Sliver) या यंत्रांतून मिळू शकतो. विदर्भात घेतल्या जाणाऱ्या कापसाच्या वाणांपासून 40 अंकांपर्यंतचे सूत बनवणे शक्य आहे. परंतु, या भागात पेळू संयंत्र नसल्याने सर्व स्थानिक खादी उत्पादक पेळूसाठी महाराष्ट्राबाहेरील केंद्रीय पेळू संयंत्रावर अवलंबून आहेत. यामुळे चांगल्या दर्जाचा शुध्द पेळू मिळण्यात दिरंगाई होते, याचा परिणाम सुताच्या आणि कापडाच्या दर्जावरही होतो. ग्रा.से.मं. शी जोडलेल्या देशभरातील देशी कापूस उत्पादक व खादी कापड बनवणाऱ्या कार्यकर्ता समूहाला पेळू उपलब्ध होईल.
- विदर्भ परिसर महाराष्ट्रातील सर्वात मोठा कापूस उत्पादक आहे, परंतु कापूस उत्पादकांना त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. कापूस उत्पादकांना विक्रीसाठी केंद्रित सूतगिरण्यांनी ठरवलेल्या बाजारभावास शरण जावे लागते. शेतकऱ्यांनी कापसाऐवजी थेट कापडच ग्राहकांना विकल्यास त्यांचा भरपूर फायदा होईल. स्थानिक पातळीवर पेळू बनवल्यास खेड्यातच कताई, विणाई करून रोजगार उभारणे व ग्राहकांना थेट कापडच विकणे सहज शक्य आहे.
पेळू संयत्र उभारल्यामुळे यांचा फायदा होईल-
- देशी, जनुक परिवर्तीत नसलेला (nonGM) कापूस उत्पादक शेतकरी २. स्थानिक पातळीवरील सूत व कापड उत्पादक ३. पर्यावरणस्नेही, आर्थिक – सामाजिकदृष्ट्या शाश्वत कापड विकत घेऊ इच्छिणारे ग्राहक.
म्हणूनच, आम्ही आपल्या मदतीने पेळू विभागातली जिनिंग, ब्लो रूम, कारडिंग, ड्रो फ्रेम आणि स्पीड फ्रेम ही यंत्रे नव्याने विकत घेऊ इच्छितो. या मशिनिंमुळे प्रतिवर्षी सरासरी २७० शेतकरी परिवार, ३५५ कत्तिनी आणि २४० विणकर परिवारांना फायदा होऊ शकतो. मशीन खरेदीसाठी साधारणपणे वीस लाख रुपयेची गरज आहे. कितीही रकमेच्या योगदानाचे स्वागतच आहे!
आपला छोटा सहयोग आम्हाला ग्रामस्वावलंबन साध्य करत पर्यावरणस्नेही स्थानिक समग्र ‘सुरक्षित कापड’ साकारण्यासाठी उपयुक्त संरचना दीर्घ पल्ल्यासाठी उभारण्यास मदत करेल.
धन्यवाद!
करुणा फुटाणे (+91 7152 244722, +91 9422633771)
अध्यक्ष, ग्राम सेवा मंडळ, गोपुरी, वर्धा - 442001 महाराष्ट्र
तन्मय जोशी (+91 8087502186) | ओजस सु. वि.(+91 9403579416) | तेजल वि. (+91 9833707598)
वरीलपैकी कोणालाही संपर्क करा अथवा gramsewamandal@gmail.com वर ‘पेळू विभागासाठी योगदान’ असा विषय लिहून इमेल करा.
for PDF file of this text : https://drive.google.com/drive/u/0/folders/0B2uzUg1sJZQ0bVI1RWZodWF1LTA
for PDF file of this text : https://drive.google.com/drive/u/0/folders/0B2uzUg1sJZQ0bVI1RWZodWF1LTA
No comments:
Post a Comment