Sunday, May 22, 2016

पाणलोट क्षेत्र नियोजन (watershed management) - वसंत फुटाणे


पाणलोट क्षेत्र नियोजनात (watershed management) माथा ते पायथा हे मूलभूत सूत्र आहे. परिसरातील सर्वोच्च स्थळापासून कामाला सुरुवात करायची असते. डोंगरमाथा, माळरान, शेती, . स्थळी जे उपचार केले जातात त्याला क्षेत्र उपचार (area treatment)म्हणतात. त्यात समतल (contour) खंदकनालीबांध (contour trench, contour bunds), ब्रशवुड डॅम, गली प्लगिंग, वाळा बांध, . असतात. हे उपचार नुसतेच पावसाचे पाणी अडविण्यासाठी नसतात तर मृदा संधारण हा त्यातील मुख्य उद्देश असतो. त्यातून मूलस्थानी जलसंधारण (in-situ rainwater harvesting) आपोआप साधते. दुर्दैवाने आज सर्वत्र जलसंधारणावरच बोलल्या जाते, मातीवर नाही.

       पाऊस यंदा नाही आला तर पुढच्या वर्षी येण्याची आशा असते. पण एकदा वाहून गेलेली माती परत येणे शक्य नाही. नदी, नाले, तळी, धरणांमधून साचलेला गाळ उचलून शेतात नेणे खूप खर्चिक आहे. त्यासाठी खनिज तेल आपण किती दिवस वापरणार आहोत?

       खडकाचा मुरूम, मुरुमापासून माती, ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. ढोबळमानाने 1 से.मि. माती तयार व्हायला 100 वर्ष लागतात असे म्हणतात. मातीत जिवाणु, बुरशी, गांडुळ, . तयार होवून ती सजीव होण्यासाठी त्यात सेंद्रीय पदार्थ असावे लागतात. असे पदार्थ जमिनीच्या वरच्या वीतभर थरातच असतात. या वरच्या थराची जपणुक केली तर जमिनीची सुपीकता टिकते आणि मूलस्थानी जलसंधरणसुद्धा साधते. गांडुळ, मुंग्या, मुंगळे, वाळवी, . सजीव जमिनीची सच्छिद्रता वाढवितात. त्यामुळे पावसाचे पाणी जागीच अधिकाधिक जिरते. जमीन पालापाचोळा, गवत, . जैवभाराने (biomass) झाकलेली असेल तर पावसाचे पाणी जागोजागी आपोआपच मुरते. या उलट टणक / उघड्या जमिनीवर पडलेला पाऊस आत जिरता त्याचा लगेचच प्रवाह होतो आणि तो प्रवाह आपल्यासोबत माती वाहून नेतो. हे अशा प्रकारे होत असलेलं जमिनीचे नुकसान भारतात सतत सुरू आहे. आपल्या देशात काही गोष्टी मुळापासूनच चुकतात. गोमुख / गंगोत्रीपासूनच प्रदूषण सुरू होते तशातला हा भाग आहे. “माती अडवा, पाणी जिरवाही घोषणा हवी. “पाणी अडवा, पाणी जिरवाही नव्हे. क्षेत्र उपचारात (area treatment) माती अडविणे आणि प्रवाह उपचारात (drain-line treatment) नाला बंडिंग, कोल्हापुरी बंधारे (KT weir), . कामे असतात. अशा उपचारातूनच खर्या अर्थी जलयुक्त शिवार होवू शकते.

       हल्ली कंपार्टमेंट बंडिंग आणि नाला खोलीकरण या दोन कामांवर भर दिला जात आहे. हे दोन्ही प्रकार अगदीच चुकीचे वाटतात. शेतकर्यांच्या शेतात कंटूर बंडिंगच व्हायला पाहिजे. कंटूर ट्रेंचचीसुद्धा गरज नसते. कंटूर बंडिंग केनीच्या सहाय्याने बैलजोडीचा वापर करून सहज करता येते. बैलजोडी उपलब्ध नसल्यास ट्रॅक्टरचा वापर करता येईल मात्र JCB सारख्या यंत्रसामुग्रीची शेतकर्यांच्या शेतात तरी गरज नाही.

       आमच्या वरुड तालुक्यातच कंपार्टमेंट बंडिंगमुळे अधिक पाऊसकाळात नुकसान झाल्याचे अनुभव आहेत. शेतकरी आत्महत्या संदर्भातील पॅकॅज अंतर्गत कृषी खात्याने घाई-घाईत राबविलेल्या कार्यक्रमात कंपार्टमेंट बंडिंग केले होते. अशा उपचारांमुळे शेतीतील माती शेताबाहेर जाणार नाही एवढेच साधते. शेतातील उंच जागेवरून माती वाहत येवून खोलगट भागात जमा होते. परिणामी उंच जागेवर जमीन नापीक होते आणि खोलगट भागात त्या शेताच्या गरजेपेक्षा अधिक माती जमा होते.

       कंटूर बंडिंग करून त्याला समांतर पेरणी केल्यास पिकाची प्रत्येक ओळ कंटूर असते. पिकात पडणारे पावसाचे पाणी जागीच अधिकाधिक मुरते. त्यामुळे मृदाजल (soil moisture)वाढते. उंच जागेवरून पावसाचं पाझरणारं पाणी, मडकं टपटप गळाव तसं हळूहळू झिरपतं. त्यामुळे पिकांची वाढ उत्तम होते. अवर्षण वर्षात याचे उत्तम परिणाम प्रकर्षाने जाणवितात. मात्र यासाठी कंटूर पेरणी आवश्यक आहे. शेतकर्यांसाठी ही बाब नवीन असल्यामुळे ते लगेचच स्वीकारत नाहीत. त्यासाठी प्रात्यक्षिकांची गरज आहे. आम्ही गेल्या 10-15 वर्षांपासून कंटूर पेरणी करतो. अंतरमशागतीला अडचण येत नाही. माझ्या गावातील एक शेतकरी कंटूर पेरणीच करतो. यवतमाळ जिल्ह्यातील सुभाष शर्मा (प्रसिद्ध सेंद्रीय शेतकरी) यांचे शेत कंटूर पेरणीसाठी प्रसिद्ध आहे. ओलीताच्या पाण्याचा त्यात सक्षम वापर केला जातो.

       “जलयुक्त शिवार अंतर्गत होत असलेल्या नाला खोलीकरणाबाबत काही दक्षता घ्यायला हवी. सरसकट खोलीकरण करू नये. मध्ये-मध्ये काही भाग खोदता तसेच राहू द्यावे. त्यामुळे पाणी साचून राहील.”, धनंजय धवड, माजी सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती गेल्या महिन्यात एका कार्यक्रमात म्हणत होते. ते पुढे असेही सांगून गेले, “एप्रिल महिन्यात त्यांच्या विहिरीची पाण्याची पातळी जेवढी पूर्वी असायची तेवढी फेब्रुवारीत आहे.” याचा अर्थ नाला खोल झाल्याने भू-जलाचा निचरासुद्धा झाला. त्यामुळे हा फायद्याऐवजी तोटाच आहे. नाली खोलीकरण कार्यक्रमामध्ये सरसकट खोलीकरण करता जागोजागी जलसंचयासाठी खोदकाम व्हावे.

       अर्थात क्षेत्र उपचर शेतात, महसूल जमीन आणि वनजमिनीत, त्यानांतर प्रवाह उपचार असा हा क्रम असावा.

 -      वसंत फुटाणे
2016

 

No comments:

Post a Comment