Sunday, January 31, 2016

नागपूर बीजोत्सव, २०१६ (दि. १९, २०, २१ फेब्रुवारी )

(आॅनलाईन नोंदणीसाठी पत्ता : http://nagpur.beejotsav.in/ )

रासायनिक शेती आणि जी. एम. बियाण्यांच्या काळात नागपूरचे अनंत भोयर शुद्ध, विषमुक्त अन्नाचा संकल्प करून सेंद्रीय शेती करत आहेत.

भेसळयुक्त तेलाच्या बाजारात नागपूरचे हर्षल अवचट अजूनही एक्स्पेलर यंत्राच्या सहाय्याने तेल गाळून शुद्ध तेल देत आहेत.
९०% हून अधिक क्षेत्रफळात बी.टी. कापूस घेणाऱ्या आपल्या देशात अकोल्याचा एक शेतकरी गट सेंद्रीय पद्धतीने देशी कापसाची लागवड करत आहे.

संपत्तीचे केंद्रीकरण आणि विषारी रसायनांचा भडिमार करणाऱ्या मोठमोठ्या कारखान्यांतील कापड नको म्हणून वर्ध्याचे 'ग्राम सेवा मंडळ' चरखे आणि हातमाग जिवंत ठेवून खादी बनवत आहे.

शेती सोडून शहरात नोकरी शोधणे अधिक बरे अशी धारणा बनलेल्या काळात नागपूरच्या प्राची माहूरकर शहरातली नोकरी सोडून शेती करत आहेत.

माॅल आणि इंटरनेटवरून खरेदी करणाऱ्या जगात काहीजण थेट शेतकऱ्यांशी जोडून घेऊन त्यांच्याकडूनच आपल्या शेतमालाच्या गरजा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत.

शोषणमुक्त शेती आणि विषमुक्त अन्नाच्या निर्मितीला पूरक धोरणे बनावी यासाठी यांच्यासारखे शेतकरी आणि ग्राहक एकत्र येऊन चळवळ उभी करू पाहत आहेत.

ही चळवळ उभी करायला हे लोक पुरे पडतील का? आपले अन्न विषमुक्त होईल का? शेतकऱ्यांची पिळवणूक संपेल का?
हे प्रश्न खूप मोठे आहेत. कदाचित एक व्यक्ती म्हणून आपल्या आवाक्याबाहेरचे. त्याची चिंता आपण करू नये. पण एक गोष्ट मात्र आपण सहज करू शकतो. ते म्हणजे यांना भेटणे. त्यांचे अनुभव जाणून घेणे. आपण ग्राहक असलो तर जमल्यास हे शेतकरी अत्यंत मेहनतीने आणि निष्ठेने उत्पादित करत असलेले अन्न विकत घेणे, ते पुन्हा मिळविण्यासाठी त्या शेतकऱ्यांशी संपर्क ठेवणे. आपण शेतकरी असलो तर सेंद्रीय अन्नाचे महत्त्व जाणणाऱ्या ग्राहकांना भेटणे, त्यांच्याशी संपर्क वाढवणे; आणि कार्यकर्ते असलो तर या साऱ्या प्रवासात आपली भूमिका काय असेल हे समजून घेणे, आणि कुठल्या पातळीवर मदत करू शकू हे पाहून त्यानुसार आपली किंवा चळवळीच्या कामाचे नियोजन आखने. तीन दिवस गप्पा मारणे, एकमेकांना समजून घेणे, एकत्र येऊन गाणी म्हणणे किंवा एेकणे, सेंद्रीय अन्नाचा आस्वाद घेणे आणि या आनंदोत्सवात सर्व प्रकारे सामील होणे.
मागच्या तीन वर्षांप्रमाणे शुद्ध अन्न आणि शाश्वत शेतीविषयी निष्ठा बाळगणारे आपण सर्वजण यावर्षी पुन्हा 'बीजोत्सवा'च्या निमित्ताने नागपूरात जमत आहोत. याच ठिकाणी देशी बियाणे व सेंद्रीय शेतमाल याची विक्री, आणि शोषणमुक्त अन्नव्यवस्था निर्मितीसंबंधी माहितीपर प्रदर्शनही राहील.

आपल्या स्वतःला, आपल्या मुलांना, कुटुंबियांना शुद्ध अन्न मिळावे यासाठी, ते पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसोबत या प्रवासात जरूर सामील व्हा!

क्रांती घडवायची नसते, ती जगायची असते!

नागपूर बीजोत्सव, २०१६
दि. १९, २०, २१ फेब्रुवारी २०१६
सर्वोदय आश्रम (विनोबा विचार केंद्र), बोले पेट्रोल पंपाजवळ, अमरावती रोड, नागपूर.

अधिक माहितीसाठी संपर्क :
निखील लांजेवार – ९३७२४७५०२५, आकाश नवघरे - ९७६६९१२७४५,
किर्ती मंग्रुळकर – ९५५२५५६४६५, रुपींदर नंदा - ९८६०७३१६६६, 
प्राची माहूरकर – ९८२३६१२४६८, अनंत भोयर – ९०४९६४१४७४.

No comments:

Post a Comment